नाशिक जिल्ह्यात आजपासून ‘महा-साधना सप्ताह’

नाशिक। दि. १ एप्रिल २०२६: केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

केंद्र शासनाने साधना सप्ताह राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात २ ते ८ एप्रिल या कालावधीत महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात अधिकारी आणि कर्मचारी यांना ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम ‘iGOT कर्मयोगी भारत’ पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पद्धती माहिती करुन घेता येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागांना त्यादृष्टीने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग यामध्ये असणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

महा-साधना सप्ताहात अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृद्धी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमात देशभरातील विविध आयआयटी संस्थांनी कृत्रिम बुध्दीमत्ता, सायबर सिक्युरिटीज व इतर महत्वाच्या विषयावर तयार केलेले एकूण 50 अभ्यासक्रमांचा समावेश आहेत. शासकीय कार्यालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना किमान 4 तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

कृत्रिम बुद्धिमत्तेचे ३ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास ‘एआय दक्ष’ बॅज आणि मार्केटप्लेस वरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास ‘कर्मयोगी उत्कर्ष’ बॅज देण्यात येणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुरस्कृत करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजाची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790