नाशिक: ‘डिलिव्हरी कॅन्सल’चा बहाणा करून मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना अटक

नाशिक। दि. १५ मार्च २०२६: अंबड पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या पार्सल डिलिव्हरीच्या कामावर असलेल्या डिलिव्हरी बॉयने विश्वासघात करून पार्सलमधील मोबाईल फोन चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन सुमारे ६ लाख रुपयांचे १५ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टसह विविध ई-कॉमर्स कंपन्यांची पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना देण्यासाठी असलेले मोबाईल फोनचे पार्सल ‘डिलिव्हरी कॅन्सल’ झाल्याचे दाखवत स्वतःकडे ठेवत होते. त्यानंतर पार्सलमधील मोबाईल फोन काढून त्या बॉक्समध्ये मसाल्याचे पाकीट भरून ते पुन्हा कंपनीच्या स्टॉकमध्ये जमा केले जात होते.

🔎 हे वाचलं का?:  पुणे येथे दोन कोटी रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला नाशिकमधून अटक !

कंपनीच्या स्टॉकची तपासणी करताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इन्स्टार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. (ठाकरे कॉम्प्लेक्स, जे.एन. प्लाझा इमारतीजवळ, अंबड) येथील स्टोअर मॅनेजर कमलेश रविंद्र सातपुते यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश देसले तसेच पोलीस शिपाई किरण भोर, मयूर पवार, फरीद इनामदार, तुषार मते, गाढवे आणि संजय सपकाळे यांच्या पथकाने केला.

तपासादरम्यान संशयित सुनिल कैलास सोमाशे (वय २७, रा. द्रोणाचार्य अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ८, पांडवनगरी, इंदिरानगर, नाशिक) आणि किरण साहेबराव बच्छाव (वय ३२, रा. सोनज, ता. मालेगाव, जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरी केलेले मोबाईल फोन हे धुळे जिल्ह्यातील नगाव परिसरातील लोकांना कमी किमतीत विकल्याचे कबूल केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानाधारित पीक नियोजनाचा अवलंब करावा

यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींकडून तसेच संबंधित व्यक्तींकडून विविध कंपन्यांचे सुमारे ६ लाख रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन हस्तगत केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -०२ किशोर काळे, सहा. पोलीस आयुक्त सचिन बारी (अंबड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपुत, सचिन खैरणार (गुन्हे), सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार: १७८२ योगेश देसले, पोलीस शिपाई: किरण भोर, मयुर पवार, फरीद इनामदार, तुषार मते, गाढवे, संजय सपकाळे, समाधान शिंदे, केशव ढगे, गांगुर्डे, सागर जाधव, संदिप भुरे, योगेश सिरसाठ, करंजे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश देसले व पोलीस अंमलदार वैभव एखंडे हे करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790