Amazon

मार्चच्या अवघ्या १२ दिवसांतच नाशिकचा पारा ३८ अंशांपार; दशकातील पहिली नोंद

नाशिक। दि. १३ मार्च २०२६: शहर व परिसरात मागील आठवडाभरापासून उष्णतेची तीव्रता वाढली असून गुरुवारी (दि. १२) उन्हाचा तडाखा विशेष जाणवला. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत प्रथमच मार्च महिन्याच्या अवघ्या बाराव्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप; २५ हजारांचा दंड

गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमान सुमारे ३७ अंशांच्या आसपास स्थिरावले होते; मात्र गुरुवारी त्यात अचानक वाढ होऊन पारा थेट ३८.५ अंशांवर गेला. गतवर्षी २५ मार्च रोजी ३८.७ अंश कमाल तापमान नोंदवले गेले होते. यंदा हा आकडा तब्बल तेरा दिवस आधीच गाठला गेल्याने मार्चअखेरपर्यंत तापमान चाळिशीच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुधन यांची काळजी घेण्याचे तसेच पुरेसे पाणी व सावलीची व्यवस्था ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांच्या मते, येत्या रविवारी आणि सोमवारी नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून त्यामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढासह देवळाली रेल्वे स्थानकांची पाहणी

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790