नाशिक। २८ फेब्रुवारी २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख कायम ठेवत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. शहर सुशोभीकरणासाठी स्थापन केलेल्या तांत्रिक सल्लागार समितीची पहिली बैठक शुक्रवारी पंचवटी येथील स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली.
समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राजक्ता बस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी अमोल चौधरी, आणि समितीचे दिनेश वैद्य, समृद्ध मोगल, प्रफुल सावंत, श्रेया कृष्णन, व आर्कि. प्रमोद कांबळे उपस्थित होते.
शहरातील निवडक भागांची दुरुस्ती व संवर्धन, ‘पेंट माय सिटी’ उपक्रमांतर्गत भित्तीचित्रे व कलात्मक साज, यात्रामार्गांवरील दिशादर्शक फलक व्यवस्था, महत्त्वाच्या स्थळांवरील प्रकाशयोजना, अमूर्त सांस्कृतिक वारशाचे जतन तसेच शहरी कला संवर्धन या प्रमुख घटकांवर सविस्तर चर्चा झाली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची पारंपरिक ओळख कायम ठेवत आधुनिक व शाश्वत दृष्टिकोनातून कामे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ २०२७ ही नाशिक-त्र्यंबकेश्वरची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये अधोरेखित करण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले. शहर सुशोभीकरण ही केवळ सजावटीची बाब नसून यात्रेकरूंना सुखद, स्वच्छ आणि आनंददायी अनुभव देण्याची व्यापक कल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत सुशोभीकरणाच्या कामांसाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी आणि नियमित आढाव्याबाबत स्पष्ट दिशा देण्यात आली. सिंहस्थपूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने तयारीला वेग दिला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
![]()

