नाशिक: युवतीच्या निर्घृण हत्येचा २४ तासांत उलगडा; प्रियकरासह मित्र जेरबंद

नाशिक। दि. २१ फेब्रुवारी २०२६: वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ परिसरात निर्जनस्थळी आढळलेल्या अज्ञात युवतीच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून, मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सारूळ येथे १८ ते १९ वयोगटातील एका युवतीचा गळा चिरलेल्या आणि चेहरा विद्रूप केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी वाडीव-हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २६/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत युवती व आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने दखल घेत मार्गदर्शन व आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार सातपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस हवालदार दिपक खरपडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अथर्व गजानन देशमुख (रा. जाधव संकुल, सातपूर) हा संशयित इसम आपल्या मित्राच्या खोलीवर रक्ताने माखलेले कपडे बदलून गेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खरपडे, अंमलदार राहुल खांडबहाले व अमोल मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण व मानवी गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

मुख्य आरोपी अथर्व देशमुख याने दोन वेगवेगळ्या कॅब बुक करून द्वारका सर्कल येथून संभाजीनगरकडे पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सातपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने भद्रकाली पोलीसांच्या मदतीने त्याला द्वारका सर्कल येथून खासगी कॅबमधून ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने बुलढाणा येथील संस्कृती काळे हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. चारित्र्यावर संशय घेत दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून मित्र सुमित देवानंद सानप यांच्या मदतीने धारदार चाकूने गळ्यावर वार करून तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आपल्या ताब्यातील डस्टर कारमधून नाशिक येथे आणून सारूळ परिसरात टाकल्याची कबुलीही त्याने दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

या कबुलीनंतर पोलिसांनी सहआरोपी संशयित सुमित देवानंद सानप याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वाडीव-हे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790