नाशिक: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

नाशिक। दि. १२ फेब्रुवारी २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असलेल्या द्वारका चौकात भुयारी मार्गाच्या मुख्य कामास प्रारंभ झाला आहे. या कामामुळे द्वारका सर्कल परिसरातील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली असून नागरिकांनी वाहतूक अधिसूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

द्वारका चौक हा शहरातील प्रमुख मार्गांचा संगमबिंदू आहे. भुयारी मार्गाच्या कामामुळे या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होत असून, शहरात इतरही सुमारे ३० रस्त्यांचे विकास, रुंदीकरण, दुरुस्ती तसेच चार उड्डाणपुलांचे बांधकाम आणि ड्रेनेज, पाईपलाईन आदी पायाभूत सुविधा विकासकामे नाशिक महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

🛣️ अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग:
👉 नाशिकरोडहून आडगावकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी बिटको जेलरोड किंवा फेम सिग्नल मार्गाचा वापर करावा.
👉 पाथर्डीकडे जाणारी जड वाहने वडनेर गेट मार्गे वळविण्यात येतील.
👉 सम्राट सिग्नल–वडाळा मार्ग हा देखील अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गरज असल्यासच चारचाकी वाहनांचा वापर करावा. नागरिकांनी दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतूक, विशेषतः सिटीलिंक बस सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी व पालकांनी घ्यावी विशेष खबरदारी:
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा किमान अर्धा ते एक तास आधी घराबाहेर पडावे. शाळा प्रशासन, बस व व्हॅन चालकांनीही बदललेल्या वाहतूक व्यवस्थेची नोंद घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

🚨 नियमभंगावर ई-चलान कारवाई:
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील आठवड्यापासून सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वयंचलित ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई सुरू करण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना मोबाईलवर थेट ई-चलानचा संदेश पाठविण्यात येईल.

वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत असताना दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून, पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

नागरिकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वेगमर्यादा पाळावी आणि दिशादर्शक फलकांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर यांच्याकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790