नाशिक: राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु; कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

मुंबई, दि १७ जून २०२५: 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकसह मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790