नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका ४० वर्षीय पुरुषाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पेठ रोडवरील फुलेनगरमधील गौडवाडी भागात मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२ ते २ वाजेदरम्यान, फुलेनगर येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५६ समोर किराणा दुकानाजवळ संजय तुळशीराम सासे (वय ४०, रा. महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) हे बसलेले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांचा निर्घृण खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
![]()

