नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): द्वारका चौकात सहा बाजूने वर्दळ असल्याने तेथे असलेल्या सिग्नलच्या धरतीवर मुंबई नाका येथे सिग्नल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण पाच सिग्नल मुंबई नाका येथे बसविले जाणार आहे.
द्वारका चौकात शहरातील सहा ठिकाणाहून वाहतुकीचे वर्दळ होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होत असल्याने या भागात सर्व्हिस रोडसह राष्ट्रीय महामार्गावरदेखील सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. एका सिग्नलचा कालावधी जवळपास दोन मिनिटे असल्याने वाहनधारकांना सिग्नलवरून गाडी बाहेर काढताना विलंब होत असला तरी वाहतुकीचे नियोजन मात्र व्यवस्थित होत आहे.
त्यामुळे मुंबई नाक्यावरदेखील द्वारका सिग्नलप्रमाणेच यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यासाठी १८ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. द्वारका भागातून मुंबई नाक्याकडे येताना पहिला सिग्नल राहील.
हा सिग्नल सुटल्यानंतर सर्व्हिस रस्त्यावरील सिग्नलही सुटेल. दुसरा सिग्नल मुंबई नाक्याकडून द्वारका भागाकडे येणारा असेल. तिसरा सिग्नल हा भाभानगर बाजूने राहील. मुंबई नाका मार्गे हा सिग्नल राहील.
चौथा सिग्नल हॉटेल साहेबांसमोर राहील, तर पाचवा सिग्नल अतिरिक्त म्हणून ठेवला जाणार आहे. हॉटेल छानकडून येणारी वाहतूक मुंबई नाक्याकडे आणण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिली.