नाशिक (प्रतिनिधी): अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल मध्यरात्रीपासून पावसाने नाशिकसह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने आभाळमाया केली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत असून धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे. तर अनेक दिवसांनंतर दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली होती. मागील काही दिवसात तर थेट उन्हाचा चटका जाणवत होता. अखेर काल मध्यरात्रीपासून पावसाने दमदार कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पाऊसच नसल्याने यंदा गोदामाई खळाळली नव्हती, तसेच गोदावरीच्या पुराचे मापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला पुराचे पाणीच लागलेले नव्हते.
मात्र रात्रीपासून पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर धरणात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी एक वाजता 520 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलं. त्यानंतर लागलीच 2 वाजता विसर्ग 520 क्यूसेक ने वाढवून 1040 क्यूसेक करण्यात आला आहे. धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार बॅटिंग केली असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. एकीकडे पावसाअभावी शेतीपिकांनी माना टाकायला सुरवात केली. मात्र पाऊस सुरु झाल्याने काहीअंशी पिकांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील निफाड, चांदवड, सुरगाणा, पेठ, इगतपुरी आदी तालुक्यात पावसाने चांगला जोर पकडला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच धरणे तहानलेली होती, मात्र कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून देखील विसर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी घेतला. दुपारी एकच्या सुमारास 1040 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढत गेल्यास विसर्गदेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अनेक धरणातून विसर्ग:
गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुपारी 2 वाजता विसर्ग 520 क्यूसेकने वाढवून 1040 क्यूसेक करण्यात आला आहे. तर संध्याकाळी 6 वाजता 4074 क्यूसेक्स होता, रात्री 8 वाजता 2208 क्यूसेकने वाढवून एकूण 6282 क्यूसेक करण्यात येत आहे. तर पालखेड धरण व समूहाच्या पाणलोट क्षेत्रात (दिंडोरी तालुका) झालेल्या मुसळधार पावसामुळे व कोळवण नदीला आलेल्या पुरामुळे पालखेड धरणातून कादवा नदीत 1500 ते 2000 क्युसेक पर्यंत विसर्ग सुरू करण्यात येऊ शकतो.
पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात होणार विसर्ग 5924 cusec होता त्यात वाढ करून सायं 6:00 वाजता 6732 cusec करण्यात येत आहे. तरी नदी तीरावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असून पावसाचा जोर असल्याने कडवा धरण पूर विसर्ग दुपारी 2.00 वाजता 848 क्युसेकने कडवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कडवा धरण विसर्ग संध्याकाळी 6 वाजता 5474 क्यूसेक करण्यात येत आहे. नांदूरमधमेश्वर धरण विसर्ग आज दुपारी 1.00 वाजता 300 क्यूसेक्स होता. दुपारी 3.00 वाजता 1314 क्यूसेक ने वाढवून एकूण 1614 क्यूसेक करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.