नाशिक (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील स्थानिक दुकानदारासोबत असलेल्या भाविकांना बाहेर पडण्याच्या मार्गावरुन आत सोडण्यास सुयोग गुरबक्षनी फ्युनिक्युलर रोपवेच्या कर्मचाऱ्याने मज्जाव केल्यावरून रोपवे कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना रविवारी (ता.४) सांयकाळी घडली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ बुधवारपासून (ता.७) बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतचे पत्र रोपवे प्रशासनासह, कळवण पोलिस, तहसीलदारांना कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आले आहे.
सप्तशृंगगडावर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास रोपवेद्वारे दर्शनासाठी जाणाऱ्या परिसरातील दुकानदार व सोबत असलेल्या भाविकांना रोपवे परतीच्या मार्गावरून आत येऊ नका, असे कर्तव्यावर असलेला रोपवे कर्मचारी सूरज मुरलीधर गायकवाड (२७, रा. सप्तशृंगगड) यांनी सांगितल्याने हर्षल संजय बेनके या दुकानदाराने वाद घातला.
त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सूरज गायकवाड ड्यूटी संपल्यानंतर रोप वेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आले असता दुकानदाराने कुरापत काढून गायकवाड यांच्या नाकातोंडावर बेदम मारहाण करून जखमी केले.
रोपवेचे अधिकारी व कर्मचारींनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, नाकातील रक्तस्राव थांबत नसल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान कळवण पोलिसांत याबाबत सूरज मुरलीधर गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान रोपवेच्या कर्मचाऱ्यांनी आज हल्ल्याच्या निषेधार्थ सुयोग गुरबक्षणी रोपवे व्यवस्थापक, तहसीलदार पोलिसांना निवेदन देत बुधवार (ता.६) पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी याआधीही अशा प्रकारच्या चार ते पाच घटना घडल्या असून स्थानिक ग्रामस्थांकडून त्रास सहन करावा लागत असताना व्यवस्थापन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे असेच चालू राहिले तर कर्मचाऱ्यांना न्याय कोण देणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.