नाशिक: अनैतिक संबंधाच्या संशयातून खुनाचा कट रचणारे पाच जण जेरबंद!
नाशिक (प्रतिनिधी): एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली असता अंबड पोलिसांनी तात्काळ दखल घेत एका तडीपारासह चार जणांना सापळा रचून अटक केल्याची घटना आयटीआय पुलानजीक घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही संशयित आयटीआय पुलाजवळ एका इसमाच्या खुनाचा कट रचत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांना मिळाली.
यावरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस नाईक किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, अनिरुद्ध येवले, नितीन सानप, मुकेश गांगुर्डे, मुरली जाधव, योगेश शिरसाठ आदींच्या पथकाने सापळा रचला होता.
👉 नाशिकची घटना: क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
संशयितांना पोलीस आले असल्याचे समजताच त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस पथकाने संशयितांचा पाठलाग करत भद्रकाली पोलिसांकडून कारवाई करत नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार असलेला निखिल उर्फ निकु अनिल बेग (23, रा. द्वारका) यासोबत रेकॉर्डवरील विशाल संजय अडागळे (२४, इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर), साहिल उर्फ सनी शरद गायकवाड (२३, रा. पंचवटी) यांसह ज्ञानेश्वर उर्फ निलेश कारभारी लोहकरे (25, रा. राणाप्रताप चौक,सिडको) रोशन संजय सूर्यवंशी (19, राणाप्रताप चौक,सिडको) यांना पोलिसांनी अटक केली.
संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता यांच्यातील एका जणाच्या पत्नीसोबत एका व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याला मारण्याकरिता त्यांनी कट रचल्याची पोलिसांनी संशयितांकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस व तिन कोयते हस्तगत केले. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहेत.