नाशिकमध्ये तीन दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याची सुरुवात

नाशिक। दि. २९ ऑगस्ट २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता विविध कामे वेगात सुरू आहेत. सर्व संबंधित यंत्रणा ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा अविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर डोम येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, शालेश शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उत्तम सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साधुग्रामची जागा अडीच हजार कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या जागेचा उपयोग भविष्यातही कुंभमेळ्यासाठीच व्हावा, यासाठी त्यांची योग्य पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. साधुग्रामच्या जागांबाबत काही नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास त्या संवेदनशीलतेने त्या दूर करण्यात येतील. शक्य त्या सुधारणा करण्यात येऊन संबंधितांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, कुंभमेळ्यासाठी खर्च होणाऱ्या निधीतून नाशिक, त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात दीर्घकाळासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याची जाणीव शासन-प्रशासनाला असून कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिक निश्चितपणे या कामांचे स्वागत करतील. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी वेळेच्या मर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी कामांना गती दिली आहे. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सहकार्याने सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी दर्जेदार, पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करून हा कुंभमेळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी...

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले , भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि विविध ज्ञानशाखांमध्ये हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशात प्रगत विचार अस्तित्वात होते. भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे प्रश्न विचारण्याची आणि नव्या विचारांचा स्वीकार करण्याची परंपरा होय. महाकुंभ या भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचा मोठा आविष्कार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरातील विविध भक्ती परंपरांचा संगम नाशिकमध्ये अनुभवता येणार आहे. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत, राजस्थानपासून गुजरातपर्यंत तसेच पूर्वोत्तर भारतातील विविध भागांतील भक्ती परंपरांचे दर्शन या सोहळ्यात घडणार आहे. भक्ती संगमाच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात होत असून ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण होईल. साधू-संतांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या सहकार्याने सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून भारताची अध्यात्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा जगासमोर मांडणारा सोहळा आहे. हा कुंभमेळा शासनाचा नव्हे, तर प्रत्येक नाशिककरांचा आहे. त्यामुळे कुंभमेळा सुंदर, स्वच्छ, सुरक्षित आणि सुरेल करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे आवश्यक आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांनी या महत्त्वपूर्ण आयोजनात आपला सहभाग नोंदवावा, कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासन आणि प्रशासनासोबत नाशिककरांनीही एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या सहभागातून नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी नेपाळमधील सरकारच्या संपर्कात- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

कुंभमेळ्याला भारताच्या सांस्कृतिक परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून भाविक, साधू-संत आणि पर्यटक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येतात. त्यामुळे कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कुंभमेळा म्हणजे केवळ नदीच्या तीरावर होणारा धार्मिक उत्सव नाही. भारताची विचारपरंपरा, अध्यात्म, संतपरंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांचा अनुभव देणारा हा महत्त्वपूर्ण सोहळा आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे आयोजन करताना धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, संगीत आणि कलात्मक कार्यक्रमांनाही महत्त्व देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने कुंभमेळ्याच्या निमित्ताने तीन दिवस विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नाशिककराने हा कुंभ ‘आपला कुंभ’ आहे, असे समजून आयोजनात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.महाजन यांनी केले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आपल्या प्रास्ताविकात सिंहस्थ कुंभमेळ्याचे महात्म्य, प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे व सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. प्राधिकरणाचे आयुक्त श्री. सिंह यांनी आभार मानले.

कार्यक्रमास आमदार किशोर दराडे, गोकुळ गिते, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ.राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, डाॅ सदानंद मोरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डाॅ. स्वामी, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबक नगरपरिषेदच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, कार्यक्रमास नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सर्व प्रमुख आखाड्यांचे साधू, संत, महंत, लोकप्रतिनिधी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ई-केवायसीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

यावेळी सिंहस्थ सहाय्यक समितीची पुस्तिका, संकेतस्थळ आणि ॲपचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच यावेळी ‘आपला कुंभपर्व माझी जबाबदारी’ प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

कुंभ दूत उपक्रमाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरुवात:
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार असल्याने प्राधिकरणामार्फत ‘कुंभ दूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहेत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. सिंहस्थ महाकुंभबाबत महाविद्यालयीन विद्यार्थामध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे सिंहस्थ कुंभमेळा अधिकाधीक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासोबत नियोजनात विद्यार्थ्यांची मदत होणार आहे.

महासिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक आयोजनात तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. प्रत्यक्ष मोठ्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांना गर्दी व्यवस्थापन, स्वयंसेवा, समन्वय, शिस्त आणि नागरिकांशी संवाद यांचा अनुभव घेता येणार आहे. त्याची सुरुवात आज ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’च्या निमित्ताने झाली. भविष्यातील सिंहस्थच्या नियोजनात आणि आयोजनात कुंभदूत म्हणून या विद्यार्थ्यांचे योगदान अधिक प्रभावीपणे घेण्यासाठी हा प्रत्यक्ष अनुभव उपयुक्त ठरणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790