NEET Paper Leak प्रकरणात नाशिकमधून युवकाला अटक

नाशिक। दि. १२ मे २०२६: राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२६ च्या कथित पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथून एका युवकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या युवकाने परीक्षेपूर्वी ‘गेस पेपर’ची छापील प्रत मिळवल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपकडून (SOG) केला जात आहे.

अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव शुभम खैरनार असे असून तो भोपाळ येथे बॅचलर ऑफ मेडिकल सायन्सेसचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. तपासानुसार, नीट परीक्षा ३ मे रोजी होण्यापूर्वी काही दिवस आधी त्याला नाशिकमध्ये ‘गेस पेपर’ची हार्ड कॉपी मिळाली होती. त्यानंतर त्याने त्याची सॉफ्ट कॉपी हरियाणातील एका व्यक्तीला पाठविल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

राजस्थान पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, खैरनारच्या चौकशीतून हा पेपर नेमका कुठून बाहेर आला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात हा ‘गेस पेपर’ नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमधून लीक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा पेपर हरियाणा किंवा राजस्थानमध्ये वापरण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मूळ प्रश्नपत्रिकेतील जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांतील १५० पैकी तब्बल १२० प्रश्न हे या हस्तलिखित ‘गेस पेपर’शी जुळत होते. संबंधित गेस पेपरमध्ये एकूण ४१० प्रश्न व त्यांची उत्तरे समाविष्ट होती. हा पेपर नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या पेइंग गेस्ट हॉस्टेल्स तसेच कोचिंग क्लासेसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी सिकर येथील एका कोचिंग सेंटरच्या समुपदेशकालाही ताब्यात घेतले आहे. त्याने कथितरित्या ५ लाख रुपये देऊन हा गेस पेपर विकत घेतला आणि व्हॉट्सअॅपद्वारे नीट परीक्षार्थींना विकल्याचा आरोप आहे. दरम्यान, राष्ट्रीय परीक्षण संस्था (NTA) यांनी पेपरफुटीच्या आरोपांनंतर ३ मे रोजी झालेली NEET-UG २०२६ परीक्षा रद्द केली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र, केरळ, हरियाणा, बिहार, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पसरलेल्या किमान ४५ जणांच्या जाळ्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या नेटवर्कमार्फत विद्यार्थ्यांना ‘गेस पेपर’ पुरविण्यात येत होता.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

विशेष म्हणजे, ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील किमान १२० प्रश्न हे व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरणाऱ्या ‘गेस पेपर’मधील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळून आल्यानंतर एसओजीने तपास सुरू केला होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, मूळ प्रश्नपत्रिकेपर्यंत काही जणांना आधीच प्रवेश मिळाला होता आणि त्याच आधारे हे मॉडेल प्रश्नपत्र तयार करण्यात आले असावे. सोमवारी राजस्थान एसओजीने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790