नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२६: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट होऊन थंडीची चाहूल लागली होती. मात्र, आता किमान तापमानात अचानक वाढ झाली आहे. शहरात काल (दि. २८) किमान तापमानाची नोंद १४.३ अंश सेल्सिअस झाली होती. आज (दि. २९) हे तापमान वाढून १८.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अवघ्या एका दिवसात किमान तापमानात ४.६ अंशांची वाढ झाल्याने हवामानातील बदल जाणवू लागला आहे.
ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता:
किमान तापमानात झालेल्या या वाढीमागे अंशतः ढगाळ वातावरण, हवेत वाढलेले आर्द्रतेचे प्रमाण आणि वाऱ्यांच्या दिशेतील बदल ही संभाव्य कारणे असू शकतात, असे मत हवामान तद्न्य वैशाली वडनेरकर यांनी व्यक्त केले.
तसेच रात्रीच्या वेळी आकाशात ढग असल्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उष्णता वेगाने बाहेर पडत नाही. त्यामुळे रात्रीचे तापमान तुलनेने जास्त राहू शकते. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचाही प्रादेशिक हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तापमानातील या वाढीमुळे पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा काहीसा कमी होऊ शकतो. मात्र, पुढील काही दिवसांतील तापमानाचा कल आणि थंडीची तीव्रता ही स्थानिक हवामान परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे.
![]()


