नाशिक शहराच्या कमाल तापमानात वाढ… जाणून घ्या सविस्तर…

नाशिक। दि. ४ मार्च २०२६: मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिक शहरासह परिसरात तापमानात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाने पस्तिशी पार केली असून येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रंगपंचमीपर्यंत तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने यंदा नागरिकांना कडक उन्हातच रंगपंचमी साजरी करावी लागू शकते.

मंगळवारी (दि. ३) शहरातील कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ऊन-सावलीचा खेळ थांबून आकाश निरभ्र झाले आहे. हवामान कोरडे राहिल्याने उन्हाची तीव्रता वाढल्याचे नागरिकांना जाणवत आहे. वातावरणातील उष्णता वाढू लागल्याने किमान तापमानातही वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे रात्रीच्या वेळीसुद्धा उकाडा जाणवू लागला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र अधूनमधून ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत होता. मार्चच्या सुरुवातीपासून हवामानात स्पष्ट बदल दिसून येत असून कोरडे व उष्ण वातावरण कायम आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ काही प्रमाणात कमी झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच उष्ण वारे वाहण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील कमाल तापमान पुढील चार दिवसांत सुमारे दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढू शकते. रविवारनंतर पुढील तीन दिवस वातावरणीय स्थितीत कोणताही लक्षणीय बदल होणार नसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

मार्च महिन्यात सामान्यतः उन्हाची तीव्रता वाढत असते. मागील वर्षी ३१ मार्च रोजी नाशिकमध्ये ३९.२ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले होते. तर २०२४ मध्ये २८ मार्च रोजी तापमान ३९.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. यंदा मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमान चाळिशी पार करण्याचे संकेत मिळू लागले असून तसे झाल्यास यंदाचा मार्च अधिकच ‘हॉट’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790