नाशिक | दि. २७ ऑगस्ट २०२६: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्यात अग्निरोधक यंत्रणेची विशेष प्रात्यक्षिक चाचणी गुरुवारी (दि. २७) घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या पार्श्वभूमीवर नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणारा बोगदा दुपारी १२ ते १ या वेळेत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या निर्देशानुसार, मेसर्स फायर टेक इक्विपमेंट अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बोगद्यात स्थापित करण्यात आलेल्या ‘मॉड्यूलर फायर सप्रेशन डेमो युनिट’ची नियंत्रित पद्धतीने आग प्रज्वलित करून कार्यक्षमता तपासली जाणार आहे. बोगद्यातील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची मानली जात आहे.
यासंदर्भात महामार्ग पोलिस, ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांनी अधिकृत पत्राद्वारे संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. चाचणीदरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक विभागाचे पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक तसेच घोटी महामार्ग पोलिस केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानही तैनात केले जाणार आहेत.
दरम्यान, दुपारी १२ ते १ या कालावधीत नागपूरकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बंदची नोंद घेऊन नियोजन करावे, तसेच पोलिस आणि महामार्ग प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
![]()


