नाशिक (प्रतिनिधी): गेल्या चार दिवसांपासून शहरात उन्हाचा चांगलाच चटका बसत उकाड्यातही वाढ असून झाली आहे. शुक्रवारी (दि. २४) कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस होते. मात्र गेल्या चार-पाच दिवसांत त्यात वाढ होत तापमान ३३ ते ३४ अंशांवर गेले आहे.
दिवसा उकाडा असला तरी रात्री मात्र हवेत गारवा निर्माण होत असल्याने शहरातील हवामान दिवसा कोरडे तर रात्री थंड असे संमिश्र असून पुढील तीन ते चार दिवस वातावरण असेच राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
वाऱ्याची दिश बदलत असून पूर्व-पश्चिम अशा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान कोरडे झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरातील तापमानातही ३ ते ४ अंशांनी बदल झाला आहे. शहरवासियांना गत पाच दिवसांपासुन उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसा एसी, पंखे सुरू ठेवावे लागत असतानाच सायंकाळनंतर हवेत गारवा निर्माण होतो. तर धरण, नदीलगतच्या परिसरात थंडी वाजत असल्याने शहरात सध्या संमिश्र वातावरण निर्माण झाले आहेत. वातावरणातील हा बदल शहरात ६ फेब्रुवारीपर्यंत जाणवणार आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे तर त्यानंतर अंशतः ढगाळ असेल, असे तज्ज्ञांनी वर्तविले आहे.