मुंबई। दि. १३ जून २०२६: सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री
करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करण्याबाबतचे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
प्रतिबंधित अन्नपदार्थाशी संबंधित प्रत्येक कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी व नामनिर्देशित अधिकारी यांनी मकोका लागू होण्याची पात्रता तपासणे आवश्यक राहील. पात्रता सिद्ध झाल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील लागू तरतुदींसह मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला जाईल. मात्र, मकोकासाठी आवश्यक प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात मकोका पात्रता, आरोपपत्रे, गुन्हा, न्यायालयीन आदेश, जप्ती, तपासाची स्थिती आणि अंतिम निकाल यांची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येईल. राज्यस्तरावर मुख्यालयात एकत्रित नोंदवही असेल.
सहआयुक्त स्तरावर जिल्हानिहाय अहवालांचा आढावा घेऊन प्रादेशिक अहवाल दरमहा आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मकोका लागू असलेल्या प्रकरणांत जामीन अर्जावर कायद्याप्रमाणे प्रभावी विरोध करण्याचे निर्देशही दिले आहेत.
![]()


