नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

नाशिक। दि. १३ जून २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी नदी काठावर घाट बांधण्यात येत आहेत. या घाटांचे काम जानेवारी २०२७ अखेर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी पालक सचिव श्री. डवले यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डाॅ. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी (नियोजन) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

पालक सचिव श्री. डवले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसह विविध विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी द्याव्यात. रस्त्यांची कामे लवकर पूर्ण होतील, असे नियोजन करावे. साधूग्राम, नाशिक परिक्रमा मार्ग, द्वारका सर्कल, रामकाल पथ, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, ओझर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती द्यावी. या सर्व कामांचा लवकरच आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. ऐनपुरे, पोलिस आयुक्त श्री. कर्णिक यांनी विविध सूचना केल्या. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, अधीक्षक अभियंता श्री. गोवर्धने, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पठारे यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या विविध विकास कामांची सद्य:स्थिती याविषयी माहिती दिली, तर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नाशिक परिक्रमा मार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाची माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790