नाशिक। दि. ६ ऑगस्ट २०२६: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदारांचे गणना अर्ज (Enumeration Form) भरण्याची प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
काही भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गणना कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
तो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत गृहभेटी- 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण / पुनर्रचना- १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत. मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्दी- 24 ऑगस्ट 2026. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी- 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत. नोटीस कालावधी / दावे व हरकती निकालात काढणे- 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 पर्यंत. मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी- 27 ऑक्टोबर 2026.
सुधारित मोहीम कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) 17 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देतील. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांना दोन प्रतीत गणना अर्ज देतील. मतदारांनी त्यावर आवश्यक माहिती भरुन स्वाक्षरी करुन एक प्रत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना परत करावी. गणना अर्ज भरुन व त्यावर स्वाक्षरी करुन दिलेल्या मतदारांची नावे 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिध्द होणाच्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील.
लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 17 व 18 नुसार कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा जास्त जागी आपले नाव मतदार यादीत नोंदविता येत नाही. ज्या मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीमध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी असतील, अशा मतदारांनी त्यांच्या सध्याच्या ठिकाणाचाच गणना अर्ज भरुन द्यावा.
संबंधित मतदाराच्या दुसऱ्या ठिकाणच्या गणना अर्जावर ऑलरेडी एन्रोल्ड (Already Enrolled) असे नमूद करण्यात येईल. त्या ठिकाणी त्याचे नाव समाविष्ट होणार नाही. या प्रारुप याद्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच भारत निवडणूक आयोग / मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत किंवा जे नव मतदार असतील त्यांना 24 ऑगस्ट 2026 ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतचे घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील.
मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकेल. तसेच संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल.
मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती एक वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्रमांक 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया (Continuous Updation) आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
![]()


