नाशिक। दि. २० नोव्हेंबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य देत नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या हालचाली कुंभमेळा प्राधिकरणाने सुरू केल्या आहेत.
या कामाच्या नियोजनासाठी शहरातील विद्यमान नेटवर्क, बॅकहॉल कनेक्टिव्हिटी आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा आढावा घेतला जाणार आहे. यासाठी शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) तांत्रिक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजता त्र्यंबक नाका येथील जुन्या जिल्हा परिषद भवनात ही बैठक होणार आहे.
या बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील सध्याच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कची क्षमता, केबल टाकण्यात आलेले मार्ग, नेटवर्क कनेक्टिव्हिटी तसेच विद्यमान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ठिकाणे आणि त्यांची कार्यान्वित स्थिती तपासण्यात येणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसविणार:
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रमुख रस्ते, नदीघाट, गर्दीची ठिकाणे, वाहतूक चौक आणि पार्किंग क्षेत्रांमध्ये अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक नेटवर्क सुविधांचेही नियोजन केले जाईल.
कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडणार:
प्रस्तावित सीसीटीव्ही यंत्रणा कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडण्याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय अतिरिक्त फायबर मार्ग, नेटवर्कची बँडविड्थ, विविध कामांची जबाबदारी आणि कामे पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.
सिंहस्थ काळात प्रभावी निगराणी, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी तांत्रिक पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
![]()


