नाशिकमध्ये किमान तापमानाचा पारा १० अंशांवर, तर निफाडमध्ये ६.५ अंशांची नोंद; थंडीचा जोर वाढला

नाशिक/निफाड। दि. २० नोव्हेंबर २०२६: नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला असून नाशिक शहरासह निफाडच्या किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. नाशिकमध्ये आज किमान तापमानाची नोंद १० अंश सेल्सिअस इतकी झाली, तर निफाडमध्ये पारा थेट ६.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नाशिक शहराच्या किमान तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू होते. १५ नोव्हेंबर रोजी १२.६ अंश, १६ नोव्हेंबरला १४ अंश, १७ नोव्हेंबरला १३.९ अंश, १८ नोव्हेंबरला १५ अंश, तर १९ नोव्हेंबरला १५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, आज तापमानात मोठी घट होऊन पारा १० अंशांवर पोहोचला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: धमकी देत व्यावसायिक तरुणाला साडेपाच लाखांचा ऑनलाइन गंडा

वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. विशेषतः पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, दुचाकीस्वार तसेच कामानिमित्त लवकर घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा अधिक सामना करावा लागत आहे.

दरम्यान, निफाड तालुक्यातील तापमानातील घसरण द्राक्ष उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या द्राक्षबागांमध्ये डिपिंगची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून घड आणि मण्यांचा आकार एकसमान करण्यासाठी हा महत्त्वाचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत वाढलेल्या थंडीचा द्राक्षघडांच्या पोषणावर आणि मण्यांच्या आकारमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरून देण्याचे आवाहन

कमी तापमानामुळे द्राक्षवेलींच्या मुळ्या आणि पेशींची क्रियाशीलता मंदावू शकते. परिणामी, मुळांपासून वेलीमार्गे फळांपर्यंत अन्नद्रव्ये आणि पाणी पोहोचण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन द्राक्षांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर द्राक्षबागांना पाणी देण्यासाठी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत अखंडित थ्री-फेज वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून होत आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर द्राक्षपिकांचे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790