Amazon

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही !

नाशिक/मुंबई। दि. १६ नोव्हेंबर २०२६: महावितरणमध्ये तब्बल २३ हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न देता थेट नोकरी मिळणार असल्याचे सांगत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना आकर्षक वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, या जाहिराती पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्यांचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १ लाख ५१ हजार पणत्यांतून साकारली भव्य प्रतिकृती

महावितरणच्या नावाने प्रसारित होणाऱ्या अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. कंपनीतील विविध पदांच्या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिराती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि भरतीविषयक अद्ययावत माहिती केवळ महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते.

तसेच, भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत लिंकही याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरून मिळणाऱ्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंकद्वारे अर्ज करणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आजपासून मनपाची धडक कारवाई; थेट गुन्हे दाखल होणार

नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका !:
भरतीच्या नावाखाली उमेदवारांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत जाहिरातीवर किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. भरतीसंदर्भातील माहितीची खातरजमा करण्यासाठी थेट महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790