नाशिक। दि. १ सप्टेंबर २०२६: केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत परिमंडळातील ७४ हजार ५५७ ग्राहकांनी सौर यंत्रणा आपल्या छतावर बसवून पारंपारीक विजेवरील अवलंबित्व कमी करत स्वतःच वीज निर्माते बनत २६० मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती सुरू केली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे जनजागृती करण्यात येत असून या योजनेचा वीज ग्राहकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
महिनाभरात तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महावितरण अहिल्यानगर मंडळात एकूण ३० हजार ४७५ ग्राहक (क्षमता १०२.७७ मेगावॅट), मालेगांव मंडळात ६ हजार ३५२ ग्राहक (क्षमता २१.७४ मेगावॅट) तर नाशिक मंडळात ३७ हजार ७३० ग्राहक (क्षमता १३५.९६ मेगावॅट) अशा एकूण ७४ हजार ५५७ ग्राहकांची सौर यंत्रणा स्थापित झाली आहे त्यातून एकूण २६० मेगावॅट विजेची निर्मितीची क्षमता आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते.
एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो.रूफ टॉप सोलर उभारणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटर सुद्धा मोफत लावण्यात येत असून त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध आहे.
वीजग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे तसेच नोंदणी करण्यासाठी पीएम सूर्यघर हे अत्याधुनिक मोबाईल अँप उपलब्ध आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा आणि ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
![]()


