नाशिक। दि. १ सप्टेंबर २०२६ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर ठगांनी नाशिकमधील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सहा दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवले. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची भीती दाखवत त्यांच्या बँक खात्यातील ४२ लाख ६० हजार रुपये कथित ‘सुरक्षित खात्यात’ वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारदार हे सेवानिवृत्त असून, २४ ते २८ ऑगस्टदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी सातत्याने व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क ठेवला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत व्हिडीओ कॉल सुरू ठेवून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. संबंधित व्यक्तीने आपण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच, मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे भासवून अटकेची भीती निर्माण केली.
तपासासाठी त्यांच्या खात्यातील रक्कम तात्पुरत्या स्वरूपात ‘शासकीय सुरक्षित खात्यात’ जमा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या बनावावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने ४२ लाख ६० हजार रुपये सांगितलेल्या खात्यात वर्ग केले.
रक्कम जमा झाल्यानंतर सायबर ठगाने बँकेची अधिकृत पावती असल्याचे भासवणारे बनावट दस्तऐवजही पाठवले. त्यामुळे काही काळ फसवणूक झाल्याचा संशय आला नाही. मात्र, २८ ऑगस्ट रोजी व्हिडीओ कॉल अचानक बंद झाल्यानंतर तक्रारदाराने बँकेत जाऊन खात्याची माहिती घेतली. त्यावेळी आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
![]()


