नाशिक | दि. ३१ ऑक्टोबर २०२६ नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पर्वाचा आज, शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) महाधर्मध्वजारोहण सोहळ्याने शुभारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजून ०२ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहणाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
गुरू ग्रहाचा कर्क राशीतून सिंह राशीत होणारा प्रवेश आणि त्यानिमित्ताने निश्चित करण्यात आलेला मुहूर्त या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त करून देत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत महाध्वजारोहण होणार असल्याने या कार्यक्रमाकडे देशभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी ९.४५ वाजता ओझर विमानतळावर आगमन होणार असून, सकाळी ११.३० वाजता त्या रामकुंड येथे पोहोचतील. येथे ध्वजपूजनानंतर दुपारी १२.०२ वाजता त्यांच्या उपस्थितीत महाध्वजारोहण होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता त्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पोहोचून ध्वजस्तंभाचे पूजन करतील. श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्या पुन्हा नाशिकला परतणार आहेत.
सायंकाळी ५.३० वाजता रामकुंड येथे आयोजित विश्वविक्रमी गोदावरी महाआरतीला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता त्या ओझर विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील.
या सोहळ्याला राज्यातील प्रमुख राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. नाशिक येथील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, श्री रामानंदाचार्य नरेंद्र महाराज तसेच तिन्ही वैष्णव आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. तर त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा शैव आखाड्यांचे साधू-महंत सहभागी होणार आहेत.
महाध्वजारोहणानिमित्त दोन्ही शहरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये सायंकाळी सुमारे साडेसहा हजार आदिवासी बांधवांच्या सहभागातून गोदावरी महाआरती साकारली जाणार आहे. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होत आहेत. सुमारे एक लाख भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आजच्या सोहळ्याची प्रमुख वैशिष्ट्ये
- दुपारी १२.०२ वाजता महाध्वजारोहणाचा शुभमुहूर्त.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रथमच ऐतिहासिक ध्वजारोहण.
- रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ येथे एकाच मुहूर्तावर ध्वजारोहण सोहळे.
- सुमारे एक लाख भाविकांच्या सहभागाची अपेक्षा.
- सायंकाळी साडेसहा हजार आदिवासी बांधवांच्या सहभागातून गोदावरी महाआरती.
![]()


