Amazon

नाशिक: सिंहस्थासाठी खासगी ‘टेंट सिटी’; भाविकांच्या निवासासाठी अतिरिक्त व्यवस्था

नाशिक। दि. २९ सप्टेंबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन निवासाची अतिरिक्त व्यवस्था उभारण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’ उभारण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली आहे. खासगी जमीनमालक तसेच जमीनमालकाशी सामंजस्य करार (एमओयू) केलेल्या संस्थांना या सुविधांसाठी अर्ज करता येणार असून, भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त निवास मिळावा यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले आहेत.

कुंभमेळ्याच्या काळात शहरातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी या टेंट सिटी उभारण्यात येणार आहेत. निवासासोबतच स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, भोजन व्यवस्था, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधांचा समावेश या तात्पुरत्या वसाहतींमध्ये करणे बंधनकारक राहणार आहे.

किमान दोन एकर जमीन आवश्यक:
खासगी जमीनमालक किंवा जमीनमालकाशी नोंदणीकृत एमओयू असलेले ऑपरेटर टेंट सिटीसाठी अर्ज करू शकतील. प्रस्तावित जमीन खासगी मालकीची, सलग आणि कोणत्याही बोजामुक्त स्वरूपाची असणे आवश्यक आहे. तसेच जमीन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असावी आणि किमान दोन एकर क्षेत्रफळाची असावी. टेंट सिटीची उभारणी तात्पुरतीच राहणार असून, मंजूर कालावधी संपल्यानंतर सर्व तंबू व संरचना हटवून जागा पूर्ववत करावी लागणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मध्यवर्ती कारागृहाचे स्वयंपाकगृह अद्ययावत करण्यासाठी एक कोटींचा निधी

नदी-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यास मनाई:
टेंट सिटीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पुरेशी स्वच्छतागृहे, स्नानगृहे तसेच दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

नदी, नाला किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडता येणार नाही. उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळण्यासही पूर्णपणे मनाई असेल.

पाणी गुणवत्ता:
पिण्याचे आणि इतर वापराचे पाणी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. बिगर-पर्वणीच्या काळात सात दिवसांतून एकदा, तर गर्दीच्या प्रमुख पर्वणीच्या काळात दररोज पाण्याची गुणवत्ता तपासावी लागणार आहे. त्याची नोंदही ठेवावी लागणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्ता १ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करणे, अधिकृत संस्थेमार्फत दररोज कचरा संकलित करणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक राहणार आहे. शक्य त्या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट किंवा बायोमिथेनेशनद्वारे प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

अग्निसुरक्षेपासून रुग्णवाहिकेपर्यंत व्यवस्था बंधनकारक:
प्रत्येक टेंट सिटीसाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. यात आग, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, स्थलांतर तसेच हवामानाशी संबंधित इशाऱ्यांचा समावेश असेल.

वीज व्यवस्थेसाठीही स्वतंत्र सुरक्षा निकष निश्चित करण्यात आले आहेत. सर्व वायरिंग सुरक्षित आणि संरक्षित असणे, अर्थ-लीकेज सर्किट ब्रेकर बसविणे तसेच भाविकांना निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी विद्युत सुरक्षा तपासणी करून घेणे आवश्यक राहणार आहे.

टेंट सिटीसाठी अर्ज लवकरच सुरू:
खासगी टेंट सिटी उभारण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अर्जासोबत प्रस्तावित जागेची माहिती, जमीनमालकीची कागदपत्रे, जीपीएस निर्देशांक, आराखडा, तंबूंची संख्या व प्रकार, वाहनतळ, पाणी-वीज-सांडपाणी व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच ऑपरेटरचा अनुभव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

🔎 हे वाचलं का?:  नांदगावच्या आठवडे बाजारातील भेळभत्त्यामुळे विषबाधेचा संशय; १४० हून अधिक रुग्ण रुग्णालयात

प्राप्त प्रस्तावांची संबंधित विभागांकडून छाननी केली जाईल. आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाशी संबंधित आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे आणि वैधानिक परवानग्या घेणे ऑपरेटरसाठी बंधनकारक असेल.

“सिंहस्थ काळातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त, नियोजनबद्ध निवास व्यवस्था निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येऊ न देता भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त निवास मिळावा, यासाठी टेंट सिटीसाठी सुरक्षा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि आपत्कालीन तयारीचे स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. खासगी जमीनमालक आणि ऑपरेटर यांना सिंहस्थाच्या व्यापक व्यवस्थेत सहभागी होण्याची संधीही या माध्यमातून मिळणार आहे,” असे नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790