कुंभमेळा २०२७: पूर्वतयारीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाची आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

नाशिक। दि. २६ फेब्रुवारी २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाने बुधवारी विविध विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन नोडल अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कर्नल व्ही. एन. सुपणेकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना स्थळनिहाय धोका व आपत्ती यांची संभाव्यता,प्रतिबंध उपाययोजना,उपलब्ध संसाधनांची ओळख व प्रभावी वापर, क्षमता बांधणी , जलद प्रतिसाद यंत्रणा याकामी मानक कार्यपद्धती (SOPs) तयार करणे तसेच विभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले.

सिंहस्थ काळातील प्रतिसाद यंत्रणा ही मानवी जीविताचे संरक्षण, घटनेवर नियंत्रण मिळविणे आणि मालमत्ता व महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण या तीन प्रमुख तत्त्वांवर आधारित असेल,असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विभागांना स्थलांतर ,तात्पुरती निवारा केंद्रे, संसाधन तैनाती क्षेत्रे आणि आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादासाठी खुल्या जागांची निश्चिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) चे सह संचालक पल्लवी गवळी आणि अतुल जोशी यांनी आधुनिक हवामान अंदाज व पूर्वसूचना प्रणालीचे सादरीकरण केले. या प्रणालीद्वारे पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग व इतर हवामान घटकांचे प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण आणि अंदाज उपलब्ध होतात. कुंभमेळा प्राधिकरण या तंत्रज्ञानाचे सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या आवश्यकतेनुसार गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि प्रतिकूल हवामानातील निर्णय प्रक्रियेसाठी वापरण्याचा विचार करीत आहे.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

आरोग्य यंत्रणेच्या तयारीवरही विशेष भर देण्यात आला. रुग्णालयांना ट्रायाज प्रणाली, वाढीव क्षमता व्यवस्था आणि रक्तपेढ्यांशी समन्वय आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यशाळेत विभागांमधील समन्वय आणि खासगी आस्थापनांचा जोखीम मूल्यांकन प्रक्रियेत समावेश यावरही भर देण्यात आला.

या कार्यशाळेस कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरीश सहाय, नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, कुंभमेळा प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय परिवहन अधिकारी किरण भोसले तसेच पोलीस, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य, अग्निशमन, परिवहन विभाग, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्मार्ट सिटी, बीएसएनएल, संरक्षण दल, वीज वितरण संस्था आणि आपत्ती प्रतिसाद यंत्रणांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

आज संयुक्त स्थळ पाहणी:
कार्यशाळेनंतर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत गुरुवारी सर्व नोडल अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थानाच्या अनुषंगाने संयुक्त स्थळ पाहणी रामकुंड येथेआयोजित करण्यात आली आहे. कर्नल सुपणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी होणार आहे.

रामकुंड ते साधुग्राम दरम्यानच्या महत्त्वाच्या स्थळांची पाहणी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष स्थळावर धोका मूल्यांकन करून निर्धारित नमुन्यात नोंदी घेणे बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790