नाशिक: महासिंहस्थासाठी ओझर विमानतळ सज्ज होणार; नवे टर्मिनल मार्चअखेर, विमानतळापासून महामार्गापर्यंत वाहतूक सुविधांची जुळवाजुळव

नाशिक। १७ ऑगस्ट २०२६ : महासिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी हवाई प्रवेशद्वार ठरणाऱ्या ओझर विमानतळाचे नवे एकात्मिक टर्मिनल मार्च २०२७अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टर्मिनलसोबतच विमानतळाला जोडणारे रस्ते आणि NH-3 वरील सुरक्षा सुविधांची कामेही वेळेत पूर्ण करण्यासाठी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी शनिवारी (ता. १५) पाहणी करून संबंधित यंत्रणांना कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या.

महासिंहस्थाच्या काळात नाशिककडे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक आणि इतर नागरिक येणार असल्याने विमानतळाची क्षमता, त्याला जोडणारी रस्ते व्यवस्था आणि महामार्गावरील सुरक्षितता या तिन्ही बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळापासून पुढील रस्ते जोडणीपर्यंतच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा एकत्रित आढावा घेण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

“महासिंहस्थाच्या काळात ओझर विमानतळ नाशिकचे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार आहे. विमानतळाचे टर्मिनल, त्याला जोडणारे रस्ते आणि महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था एकाच वेळी सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक कामाच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवून अडथळे दूर करण्याच्या आणि कामांना आवश्यक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

टर्मिनलच्या कामाला मार्चअखेरची मुदत:
ओझर विमानतळावर सुरू असलेल्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या कामाची आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि प्राधिकरणाचे उपआयुक्त योगेंद्र चौधरी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. बांधकामाची सद्यस्थिती आणि वेळापत्रकाचा आढावा घेत कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक पोलीस दलात 'वन मोबाईल व्हॅन' दाखल

३१ मार्च २०२७पर्यंत टर्मिनलचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टर्मिनलच्या अंतर्गत भागात प्रस्तावित कलाकृती आणि भित्तिचित्रांच्या मांडणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

विमानतळाकडे येणारे रस्तेही वेळेत पूर्ण होणार:
विमानतळावर प्रवाशांची क्षमता वाढल्यानंतर त्याला सक्षम रस्ते जोडणीची आवश्यकता लक्षात घेऊन आयुक्तांनी दिंडोरी तालुक्यातील ओझर-जानोरी रोड या रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांचीही पाहणी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसमवेत झालेल्या पाहणीत कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कामांना गती देऊन ३१ मार्च २०२७पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक रिंगरोडसाठी आडगाव येथील भूसंपादन प्रक्रियेला वेग

NH-3 वर १२ सुरक्षा संरचना:
दरम्यान, दहावा मैल येथील NH-3 वर १२ स्वतंत्र सुरक्षा संरचनांच्या सुरू असलेल्या कामाचीही पाहणी करण्यात आली. यामध्ये एका स्वतंत्र उड्डाणपुलाच्या संरचनेचा समावेश आहे.

NHAIच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामांची प्रगती निर्धारित वेळापत्रकानुसार असून डिसेंबर २०२६पर्यंत ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महासिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या सर्व कामांमध्ये समन्वय राखून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित यंत्रणांना साप्ताहिक प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790