नाशिक: सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनासाठी मंदिर संस्थानांना एकत्र आणणार कुंभमेळा प्राधिकरण

नाशिक। १५ जून २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त आणि प्रतिनिधींना एकत्र आणून निर्माल्य व्यवस्थापनासाठी शाश्वत आराखडा तयार करण्यात येणार आहे.

यासाठी १८ जून रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख मंदिर संस्थानांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मंदिर परिसरात निर्माण होणारे निर्माल्य, फुले आणि पूजाविधीनंतर जमा होणाऱ्या इतर साहित्याचे योग्य संकलन व प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे ६३४ ग्रॅम सोन्याची लगड अवघ्या चार तासांत मालकाकडे परत

मंदिर संस्थानांच्या सहभागातून निर्माल्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे, गोदावरी नदीचे संवर्धन करणे आणि सिंहस्थापूर्वी कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

“सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा आपल्या धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणारी व्यवस्था उभारण्याची संधी आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापनही तितक्याच आदराने आणि जबाबदारीने होणे आवश्यक आहे. मंदिर संस्थाने, नागरिक आणि विविध घटकांच्या सहभागातून गोदावरी संवर्धनासोबतच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी दीर्घकालीन उपयोगी ठरणारे शाश्वत मॉडेल विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात २० जूननंतर मान्सूनची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता

या बैठकीत मंदिर स्तरावरील निर्माल्य संकलन व्यवस्था, आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि निर्माल्यावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांसोबत समन्वय याबाबत चर्चा होणार आहे.

निर्माल्य व्यवस्थापनासोबतच ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेवरही भर दिला जाणार आहे. संकलित निर्माल्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची शक्यता तपासली जाणार असून, या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही प्रयत्न राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ; रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती होणार संकलित

मंदिर संस्थानांचे मार्गदर्शन आणि सहभागातून निर्माल्य व्यवस्थापनाचे प्रभावी आणि अनुकरणीय मॉडेल उभारण्याचा प्रयत्न असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790