Amazon

नाशिक: अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानाधारित पीक नियोजनाचा अवलंब करावा

नाशिक। दि. १५ जून २०२६: चालू वर्षात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे वितरण अनियमित राहण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी हवामानाधारित व शाश्वत पीक नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे काही भागांत पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात दीर्घ खंड पडणे किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी हवामान आधारित पीक नियोजनावर भर देणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कागदी टपालाला आळा; ई-ऑफिसचा प्रभावी वापर करा; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

खरीप हंगामासाठी पीक नियोजन करताना प्रमाणित व उपयुक्त वाणांची निवड करावी. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. उपलब्ध ओलावा लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कमी कालावधीत येणारी व दुष्काळ सदृश परिस्थिती सहन करणारी पिके व वाण निवडणे, तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे जोखीम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सोयाबीन, मूग, बाजरी, तूर यांसारख्या पिकांसाठी स्थानिक हवामानास अनुरूप शिफारस केलेल्या वाणांची निवड करून आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. पावसात खंड पडल्यास पुनर्पेरणीची वेळ येऊ नये यासाठी पर्यायी पीक नियोजन तयार ठेवावे. ज्या भागांत पाणीटंचाईची शक्यता आहे, त्या भागांत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सप्टेंबरमध्येच नाशिककरांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; पाणीटंचाईचे सावट

शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, आच्छादन (मल्चिंग), सेंद्रिय खतांचा वापर, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण यांसारख्या उपाययोजनांचा अवलंब करावा. रासायनिक खतांचा संतुलित वापर करून मृदा परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणेही आवश्यक आहे. ‘खत बचावो’ अभियानांतर्गत रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असल्याने नैसर्गिक व जैविक निविष्ठांचा वापर वाढविल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

शेतकऱ्यांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि विद्यापीठांच्या शिफारशींनुसार हवामान आधारित सल्ल्यांचे पालन करावे. हवामान अंदाज, पीक सल्ला आणि आपत्कालीन पीक नियोजनाविषयी अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रकल्प संचालक श्री. काशिद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790