
नाशिक, दि. १८ मे २०२५: कळवण तालुक्यातील ओतूर धरणाच्या दुरुस्ती कामामुळे सुमारे 446 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या धरणाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. कळवण या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामाची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली. त्यानंतर आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बा.क. शेटे, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे, सहायक अभियंता देवी प्रसाद सोनवणे, कनिष्ठ अभियंता गजानन फटपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता रोहिणी वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ओतूर धरणाच्या पाटचारीसह आवश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या धरणाच्या पूर्णत्वासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. ओतूर धरणाच्या कामावर ४५ कोटी १७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ओतूर धरणाच्या दुरुस्तीमुळे पावसाळयात धरणात ९०.१६ दशलक्ष घनफूट जलसाठा होऊन ओतूर खोरे परिसरातील ४४६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. जून २०२६ पर्यंत धरणाचे काम पूर्ण करावे, असेही त्यांनी निर्देश देत राज्य शासनातर्फे शेतकरी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.