नाशिक: पात्र मतदारांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

नाशिक। दि. २५ जून २०२६: राज्यात ‘विशेष सखोल मतदार पुनरीक्षण’ (SIR – Special Intensive Revision) मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष राहील, असे स्पष्ट करत, पात्र नागरिकांचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचा विभागीय पातळीवर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सह मुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव सुनील पवार, पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर्वश्री आयुष प्रसाद (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर), भाग्यश्री विसपुते (धुळे), रोहन घुगे (जळगाव) आणि डॉ. मिताली सेठी (नंदुरबार) यांची व्यासपीठावर उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ भागांत गुरुवारी (दि. २५ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत तपशीलवार आढावा घेतला. या मोहिमेच्या अनुषंगाने विहित वेळापत्रकानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी
३० जून ते २९ जुलै या दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन माहितीची पडताळणी करणार आहेत。या मोहिमेच्या अनुषंगाने अधिक जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग घेतला जात आहे. पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविली जात असून कोणाच्याही मनात कोणतीही शंका राहणार नाही, नागरिकांच्या शंकांचे निरसन होईल. या मोहिमेचा उद्देश त्यांना समजावा यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नांदूरमध्यमेश्वर येथे २८ जून ला 'पावसाळापूर्व पक्षी गणना' होणार

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.चोकलिंगम म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने बीएलओ यांना या मोहिमेचे महत्व समजावून सांगावे. कोणताही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि अपात्र मतदाराची नोंद यादीत असणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिम यशस्वी करण्यासाठी जनजागृती, शंकाचे निरसन, लोकप्रतिनिधींचा सहभाग आदी घटकांना विश्वासात घेवून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई परीक्षा मोफत कोचिंगकरिता 30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच पाचही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील एसआरआय मोहिमेच्या अंमलबजावणी बाबत सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी पाचही जिल्ह्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790