नांदूरमध्यमेश्वर येथे २८ जून ला ‘पावसाळापूर्व पक्षी गणना’ होणार

नाशिक। दि. २४ जून २०२६: ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ आणि जागतिक दर्जाचे ‘रामसर’ स्थळ असलेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात २८ जून रोजी ‘पावसाळापूर्व पक्षी गणना’ आयोजित करण्यात आली आहे.

अभयारण्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास आणि स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद घेण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाने या उपक्रमाचे नियोजन केले आहे. सकाळी ७ वाजेपासून या पक्षीगणनेला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी जलाशयांची पाणीपातळी, पाणथळ जागांची स्थिती, अन्नसाठा यामुळे पक्ष्यांच्या वावरात बदल होतात. या पार्श्वभूमीवर, वन्यजीव संवर्धनासाठी हा डेटा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नऊ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या; आरोपीला १२ तासांत अटक

सहभागी होणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:
१. वेळेचे बंधन: पक्षी निरीक्षणासाठी पहाटेची आणि सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे गणनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनी रविवारी सकाळी ठीक ७:०० वाजता चापडगाव येथील निसर्ग पर्यटन संकुलात उपस्थित राहावे.
२. साहित्य: पक्ष्यांची अचूक नोंद घेता यावी यासाठी इच्छुकांनी आपल्या सोयीनुसार कॅमेरा, नोंदवही (डायरी) आणि पेन सोबत ठेवावे.
३. पोशाख व शिस्त: निसर्गाशी एकरूप होणारे (उदा. हिरवे, तपकिरी किंवा फिकट रंगाचे) कपडे परिधान करावेत. अभयारण्याच्या क्षेत्रात फिरताना शांतता राखणे व प्लास्टिक कचरा न करणे बंधनकारक राहील.
या नाविन्यपूर्ण व वैज्ञानिक मोहिमेत सहभागी होऊन निसर्गाच्या या अद्भुत सफारीचा आणि पक्षी विश्वाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी व वनविभागाच्या पथकाकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790