नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२५: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत दरवर्षी विविध ९२ खेळप्रकारांच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले जाते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा (१९ वर्षांखालील मुले व मुली) आयोजनाची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या अनुषंगाने या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक विभागातून प्रत्येकी ३० खेळाडूंचा संघ तसेच निवड चाचणीसाठीचे खेळाडू (मुले व मुली मिळून) सहभागी होणार आहेत. एकूण आठ विभागांतून ३४० खेळाडू, तांत्रिक समिती सदस्य व निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व स्वर्गीय सुरेखाताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनी यांच्या वतीने या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघांना अनुक्रमे रु. ५०००, रु. ३००० आणि रु. २००० अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंना फळे देण्याची व्यवस्था केली आहे.
क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे व जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे.
![]()
