पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न
नाशिक (प्रतिनिधी): गर्भधारणापुर्व व प्रसुती पुर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायदा 1994 सुधारीत 2003 कायद्याचा प्रचार, प्रसिद्धी प्रभावीपणे करण्यासोबतच गेल्या तीन वर्षात ज्या तालुक्यात लिंग गुणोत्तर प्रमाण घटले आहे तेथे लिंग गुणोत्तर वाढीकरिता प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती गठीत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समितीची आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, नाशिक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सुर्यवंशी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.विजय देवकर, मालेगाव महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, डॉ.हर्षल नेहते, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत देवरे, जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, पोलीस अधीक्षक एम. व्ही. चव्हाण जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहूल हडपे, ॲड सुवर्णा शेपाळ यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, काही तालुक्यात गत तीन वर्षांत लिंग गुणोत्तर कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे, ही बाब चिंताजनक असून लिंग गुणोत्तर घटण्याची नेमकी कारणे शोधणे व त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत समिती गठीत करण्यात येवून याबाबतचा अहवाल त्वरीत सादर करावा.
गर्भधारणापुर्व व प्रसुती पुर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंधक) कायद्यानुसार जिल्ह्यातील अवैध सोनोग्राफी केंद्रांची काटकोर तपासणी केली जावी तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी. मातृवंदाना योजनेंतर्ग लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले लाभ त्वरीत प्रदान करण्यात यावे. यासोबतच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आभा कार्डसाठी प्रत्येक व्यक्तीची नोंदणी होणे अत्यावश्यक असून यातून जिल्ह्यातील एकही व्यक्ती सुटता कामा नये याबाबतचे सुत्रबद्ध नियोजन करावे. नोंदणीसाठी ग्रामीण भागासह शहरातही विशेष कॅम्प आयोजित करून नागरिकांची नोंदणी करण्यास गती द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत दिल्या.