नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
माणिकखांबजवळ साडेतीन कोटींचा ऐवज केला होता लंपास
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाशिक महामार्गावरील माणिकखांब- मुंढेगाव शिवारात पहाटेच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत काही अज्ञातांनी चारचाकी वाहन अडवत डोळ्यात मिरचीची पूड टाकून व लोखंडी रॉडचा धाक दाखवत सोन्याची बिस्किटे व दागिण्यांची चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा करण्यात आला.
माणिकखांब – मुंढेगाव शिवारात पडलेल्या दरोड्याच्या तपासासाठी अज्ञात आरोपींना शोधण्यासाठी माणिकखांब-मुंढेगाव शिवारात जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसची इको (एमएच १२ यूजे ७९४८) नाशिककडे जाताना गुरुवारी (दि. १८) पहाटे तीन वाजता तोंडाला रुमाल बांधलेल्या पाच ते सहा व्यक्तींनी लाकडी व लोखंडी रॉड घेत इको कारला इटिंगा कार आडवी लावली.
यावेळी दूसरी गाडी इकोच्या मागे लावत धाक दाखवून चालकाला कारचा दरवाजा उघडायला लावला. चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मारहाण करत वाहनातील एक किलो १०० ग्रॅम वजनाचे ११ सोन्याचे बिस्किटे, तीन किलो ४०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा व दागिने आणि एक स्क्रीन टच मोबाइल असा ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी हिसकावून घेत पोबारा केला होता.
कुरिअरमधील जुन्या कर्मचाऱ्यांची होणार चौकशी:
पहिले पथक मुंबईतील काळबादेवी येथून जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसचे सोने घेऊन नाशिककडे निघालेल्या व्हॅनच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहे. दुसरी टीम नाशिक शहरात तपास करणार आहे. तिसरी टीम एक वर्षापूर्वी जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या आग्रा येथील चालकाचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहे.