नाशिक: ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर रात्रभर जागे होते अधिकारी आणि कर्मचारी…

नाशिक। दि. ७ जुलै २०२६: सोमवार… आठवड्याचा पहिला दिवस… अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. मात्र, दुपारी सुमारे १ वाजता भारतीय हवामान विभागाने मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भाग, सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टीची शक्यता वर्तविली. ही माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर संपूर्ण जिल्हा प्रशासन तत्काळ सतर्क झाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. तसेच नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.

संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन संबंधित भागातील शाळा, महाविद्यालये आणि आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तलाठ्यांपासून अपर जिल्हाधकारी पर्यंत तसेच ग्रामसेवकांपासून उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले. धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) एक तुकडीही मागविण्यात आली असून ती रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाली. या संपूर्ण घडामोडींचे केंद्रबिंदू ठरला तो जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककरांनो, आज घरातच सुरक्षित राहा; शाळा, बाजारपेठा बंद... अत्यावश्यक सेवा सुरूच

या विभागामार्फत विविध आदेश निर्गमित करण्यात येत होते आणि त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी आवश्यक कार्यवाही करत होते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांचेशी संपर्कात होते.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद हे भारतीय हवामान विभागाशी सातत्याने संपर्कात राहून अद्ययावत माहिती व्हॉट्सअॅप समूहांद्वारे सर्व यंत्रणांपर्यंत पोहोचवत होते. भारतीय हवामान विभागाने काही ठिकाणी ३०० मिलिमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन रात्रीच इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिकमध्ये दाखल झाले.
त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने आणि सखल भागात पाणी साचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंत्री श्री. महाजन आणि जिल्हाधिकारी श्री. प्रसाद रात्री सुमारे ११ वाजता त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा; त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह ग्रामीण भागात उद्या शाळा, बाजार बंद, मंदिरेही राहणार बंद

दरम्यान, जिल्हा आपत्ती निवारण कक्षात २४×७ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी येथे कार्यरत होते. नियंत्रण कक्षात चोवीस तास तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जिल्ह्यातील पावसाच्या प्रत्येक घडामोडीची माहिती जिल्हाधिकारी श्री. प्रसाद हे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह वरिष्ठ प्रशासनाला वेळोवेळी देत होते. तसेच वाऱ्याचा वेग, ढगांची दिशा आणि हवामानातील बदल यांची अद्ययावत माहिती तसेच शासन, प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माध्यमांना तसेच विविध समाज माध्यम समूहांवर प्रसारित करण्यात येत होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दि. ८ जुलै रोजी आयोजन

मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजता इगतपुरी तालुक्यात पूरसदृश परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री. प्रसाद आणि सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता घटनास्थळी रवाना झाले. सार्वजनिक बांधकाम विभागालाही संभाव्य दरड कोसळण्याच्या घटनांबाबत सतर्क राहून रस्ते तातडीने वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य, पशुसंवर्धन, वन, पोलीस, ग्रामपंचायत आदी विभागांना सतर्क राहण्याच्या सुचना देत होते. त्याचवेळी मालेगाव चे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण हे सटाणा व सुरगाणा तर नाशिक च्या अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील या दिडोंरी आणि नाशिक शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

दुपारी सुमारे १२ वाजल्यानंतर पावसाचा जोर ओसरू लागला आणि संभाव्य मोठे संकट टळल्याने रात्रभर सतर्क राहिलेल्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रभर सुरू असलेल्या या सज्जतेमुळे जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनातील तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790