नाशिककरांनो, आज घरातच सुरक्षित राहा; शाळा, बाजारपेठा बंद… अत्यावश्यक सेवा सुरूच

खासगी कार्यालयांनी शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा; महापालिका प्रशासनाची नागरिकांना सतर्कतेची सूचना

नाशिक। दि. ७ जुलै २०२६: नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी (दि. ७ जुलै) ढगफुटीसदृश अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर शहर प्रशासनाने व्यापक खबरदारीची पावले उचलली आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असून, खासगी आस्थापना, उद्योग, व्यापारी प्रतिष्ठाने आणि कार्यालयांनी शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच व्यापारी संघटनांनी बाजारपेठा बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची आणि काही भागांत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कोणतेही अत्यावश्यक कारण नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे कोसळणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. खासगी कार्यालयांनीही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी नागरिकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची पूर्वतयारी करून घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक इमारती, नदीकाठ, नाले तसेच पाणी साचणाऱ्या भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘शिक्षण उत्सव २०२६’मधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव; संवाद, नवोपक्रम आणि सहकार्याला नवी दिशा

संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभाग आणि वॉर्डांमध्ये जेसीबी, पाणी उपसा पंप, जनरेटर, आवश्यक आपत्कालीन साहित्य आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. नाले आणि ड्रेनेज व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असून, पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची विशेष पाहणी केली जाणार आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके चोवीस तास सज्ज राहतील. नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जाणार असून, मदतीचा संदेश मिळताच तातडीने पथके घटनास्थळी रवाना केली जातील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
महापालिकेने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवावा तसेच शक्य असल्यास घरूनच काम करण्यास प्राधान्य द्यावे. झाडांच्या खाली किंवा धोकादायक इमारतींच्या परिसरात वाहने उभी करू नयेत. नदी, नाले आणि पाणी साचलेल्या भागांमध्ये जाणे टाळावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महापालिकेच्या अधिकृत सूचना आणि हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790