नाशिक: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी बंद राहणार

नाशिक। दि. १६ ऑगस्ट २०२६: मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कल येथील इंटरचेंज प्रकल्पाच्या कामासह शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील विविध तातडीची दुरुस्ती, क्रॉस-कनेक्शन आणि पाइपलाइन गळतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर बुधवारी (दि. १९ ऑगस्ट) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार आधीच पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरला जाणार असाल तर हे आधी वाचा… खासगी वाहनांना प्रवेशबंदी, वाहतुकीत मोठे बदल

द्वारका सर्कलवरील कामासाठी १२ तासांचा शटडाउन:
मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका सर्कल येथे सुरू असलेल्या अंडरपासच्या कामात ५०० मिमी व्यासाची गुरुत्व वाहिनी अडथळा ठरत होती. या वाहिनीचे यापूर्वी स्थलांतर करण्यात आले होते. आता प्रकल्पाचे पुढील काम सुरू ठेवण्यासाठी नव्याने टाकण्यात आलेली गुरुत्व वाहिनी विद्यमान वाहिनीला जोडणे आवश्यक आहे.

यासाठी क्रॉस-कनेक्शनचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १२ तासांचा पाणीपुरवठा शटडाउन आवश्यक असल्याचे संबंधित प्राधिकरणाकडून महापालिकेला कळविण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्रावणातील सोमवार व शनिवार कपालेश्वर मंदिर व रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

शहरभर १७ अत्यावश्यक कामे:
या शटडाउनच्या कालावधीत महापालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये तब्बल १७ तातडीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

पूर्व विभागात चड्ढा पार्क जलकुंभाच्या ४०० मिमी वाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्ती, ७०० मिमी मुख्य गुरुत्व वाहिनीवरील व्हॉल्व्ह ग्रीसिंग, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ-वॉटर पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसविणे तसेच कल्पतरूनगर जलकुंभातील व्हॉल्व्ह दुरुस्ती केली जाणार आहे.

नवीन नाशिक विभागात भवानीमाता जलकुंभ, पवननगर टाकी आणि आर. डी. सर्कल परिसरातील विविध कामे करण्यात येणार आहेत.

पंचवटी विभागात फिल्टरेशन प्लँटजवळील पाच पाइपलाइनचे क्रॉस-कनेक्शन, तर सातपूरमधील पपया नर्सरी चौकात मोठ्या व्यासाच्या पाइपलाइनचे क्रॉस-कनेक्शन केले जाणार आहे. याशिवाय अशोकनगर जलकुंभासाठी नवीन पाइपलाइन जोडणी आणि शहरातील विविध ठिकाणच्या पाइपलाइन गळती दुरुस्तीची कामेही केली जाणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

नाशिकरोड विभागात विहितगाव नवीन जलकुंभासाठी क्रॉस-कनेक्शन, स्लूस व्हॉल्व्ह बसविणे, ९०० मिमी गुरुत्व वाहिनीचे वॉशआउट तसेच अमृत २.० अंतर्गत पाइपलाइनशी संबंधित कामे हाती घेण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे :
मंगळवार, १८ ऑगस्ट :
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
बुधवार, १९ ऑगस्ट : सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता
नागरिकांनी : आदल्या दिवशी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790