नाशिक शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत आज (दि. ३०) महत्वाचे बदल !

नाशिक। दि. ३० डिसेंबर २०२५: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर येथील मनपा विभागीय कार्यालयामध्ये महानगरपालिका निवडणुकीकरिता मंगळवारी (दि. ३०) अखेरचा दिवस असल्याने गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक शाखेकडून सर्व प्रकारच्या वाहनांना दुतर्फा प्रवेश बंद करण्यात आला आहे.

त्र्यंबकरोडवरील वाहतूक एमआयडीसीमधून पर्यायी मार्गाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मार्गस्थ होणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे. यामुळे सातपूर विभागीय कार्यालयात इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांची मोठी गर्दी सकाळपासूनच होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना जारी केली आहे. सकाळी नऊपासून अधिसूचना अमलात येणार आहे. पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका, रुग्णवाहिकांना लागू राहणार नाहीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री

प्रवेश बंद मार्ग:
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील सकाळ सर्कलपासून पुढे महिंद्र सर्कलपर्यंत वाहनांना दोन्ही बाजूंच्या मार्गावर प्रवेश बंद राहणार आहे. एमआयडीसीमधील पर्यायी मार्गाचा वाहनचालकांनी वापर करावा.

पर्यायी मार्ग असा:
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सकाळ सर्कल येथून स्वराज्य चौकाकडे मार्गस्थ होत व्हिक्टर पॉइंटमार्गे त्र्यंबकेश्वरकडे रवाना व्हावे. त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणाऱ्या वाहनांनी व्हिक्टर पॉइंटकडून स्वराज्य चौकातून पुढे त्र्यंबकरोडच्या दिशेने मार्गस्थ व्हावे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790