नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरातील बिटको चौक ते नांदूरनाका या रस्त्यावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात स्टॉल लावण्यात आले असून, याठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरील जड व अवजड वाहतूक उद्यापासून (दि. ५ सप्टेंबर २०२४) ते शनिवारपर्यंत (दि. ७ सप्टेंबर २०२४) पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार गुरुवारी (दि. ५) सकाळी ९ ते शनिवारी (दि. ७) रात्री दहा वाजेपर्यंत बिटको चौक ते नांदूर नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विक्रीचे २८७ स्टॉल लावण्यात आलेले आहे.
त्यामुळे याठिकाणी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता आहे. यातून वाहतूक नियोजन कोलमडून कोंडीची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. तर, या दरम्यान, नांदूर नाका ते बिटको चौकाकडे येणारी वाहने ही नांदूर नाका ते छत्रपती संभाजीनगर रोडने पुढे इतरत्र मार्गस्थ होतील.
तसेच, बिटको चौकातून जेलरोड मार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक ही बिटको सिग्नलकडून फेम सिग्नलमार्गे द्वारका चौकाच्या दिशेने मार्गस्थ होतील. पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांसह या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना सदरचे निर्बंध लागू राहणार नाहीत असेही उपायुक्त खांडवी यांनी स्पष्ट केले आहे.