नाशिक (प्रतिनिधी): कसबे सुकेणे येथे काही दिवसांपूर्वी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ओझर येथे कोठडीत असलेला आरोपी योगेश माळी याला न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ओझर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची 14 दिवसांसाठी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याच्या तयारीत असताना सदर आरोपीने लघवी लागल्याचे सांगून पोलीस स्टेशन आवारात एका मोकळ्या जागेत गेला.
त्याच्या सोबत एक पोलीस कर्मचारी गेला असता हातात बेड्या असलेल्या माळीने सोबत आलेल्या पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख विक्रम देशमाने, आदित्य मिर्खेलकर, ओझर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, तुषार गरुड यांनी शोध पथकाला सूचना देऊन आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पथकाला मार्गदर्शन केले.
सदर तपास पथकात जालिंदर चौघुले, दीपक गुंजाळ, विश्वनाथ धारबळे, रावसाहेब मोरे, अजय मदने, संदीप बोडके, राजेंद्र डांबाळे, एकनाथ हळदे, भास्कर जाधव, जितेंद्र बागुल, कैलास कडाळे,दुर्गेश बैरागी व महिला पोलिसांनी रात्रभर डोळ्यात तेल घालून नांदगाव, मोहाडी, शिरवाडे वणी, मनमाड, नाशिक रोड रेल्वे स्टेशन जिल्ह्यातील बस स्टँड या विविध ठिकाणी रात्रभर पाळत ठेऊन शोध मोहीम राबवली. त्यानंतर बुधवार दुपारपर्यंत तो सापडून आला नव्हता.
पोलीस त्याच्या राहत्या घरावर व नांदगाव साकोरा येथे असलेल्या सासुरवाडी ठिकाणी पाळत ठेऊन होते. दुपारी दीड वाजता घराजवळील एका पडक्या घरात माळी दिसताच पोलीस हवलदर विलास बिडगर यांनी त्यास पाहिले व पोलिसांना सूचना देऊन त्यास ताब्यात घेऊन ओझर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पुढील कारवाई ओझर पोलीस करत आहे.