नाशिक: सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट; दोन महिलांचे दागिने लंपास

नाशिक। दि. १५ एप्रिल २०२६: इंदिरानगर परिसरात सोनसाखळी चोरांनी पुन्हा सक्रिय होत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत मिळून सुमारे १.६५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.

पहिली घटना सोमवारी (दि. १३) सकाळी सुमारे ६.४५ वाजता रथचक्र सोसायटी परिसरात बाप्पा चौक ते राजसारथी सोसायटीदरम्यान घडली. उषा पाटील (६५, चिंतामणी गणेश कॉलनी) या मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ येत कपड्यांच्या दुकानाबाबत विचारणा केली. त्यांनी माहिती नसल्याचे सांगताच आरोपीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १३ ग्रॅम वजनाची सुमारे ६५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पेंडंट जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपी बाप्पा चौकाच्या दिशेने वेगाने पसार झाला. पाटील यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

दुसरी घटना त्याच दिवशी रात्री सुमारे ८.१५ वाजता चेतनानगर येथील इच्छापूर्ती गार्डन परिसरात घडली. प्रतिभा गोसावी (६५, अयोध्या नगरी) या चालत घरी परतत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी विशेषतः सकाळी व रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790