नाशिक (प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन अंतर्गत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविली. अचानक राबविलेल्या या ऑपरेशनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
यावेळी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम घेऊन टवाळखोरांवर कारवाई करीत दणका दिला.
परिमंडळ दोन अंतर्गत शहर आयुक्तालयातील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
उपनगर, नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढल्याने काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.
तसेच, आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील तसेच, तडीपार करण्यात आलेल्या १३४ गुन्हेगारांची तपासणी केली. या गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात येऊन त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.
तसेच, ६९ टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात आली. कोटपाअन्वये इंदिरानगर हद्दीत ५ केसेस करण्यात आला.
तर, उपनगर हद्दीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी दीपक राजाराम पगार (४०, रा. देवळाली गाव) यास अटक केली. ३२ जणांना समन्स बजाविण्यात आला तर ९ जणांना वारंटची बजावणी केली.
या कारवाईत परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, सहायक आयुक्त आनंदा वाघ यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी होता.