
नाशिक, दि. १२ मे २०२५: कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी सतीश बोरा यांची निवड झाली आहे, तर सरचिटणीसपदी सुभाष सबनीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठी भाषेसाठी काम करणारी कुसुमाग्रज मराठी विचार मंच ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि सोशल मीडियाच्या विविध साधनांमुळे वाचनाची गोडी कमी होत असल्याने वाचन संस्कृती वाढावी म्हणून खास तयार केलेल्या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेत आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यर्थ्यांना ‘मराठीचे उपासक’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येते.
गेल्या पाच महिन्यांपासून जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात सुमारे तीन लाख ‘मराठीचे उपासक’ तयार करण्याचे काम केले जाणार आहे. नूतन कार्यकारिणीने मराठी भाषाविषयक नवनवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. सर्व नाशिककरांनी संस्थेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सतीश बोरा यांनी केले आहे.
नवनिर्वाचित पदाधिकारी असे:
उपाध्यक्ष: दिलीप बारवकर आणि आनंद देशपांडे, खजिनदार : जयप्रकाश मुथा, कार्यकारिणी सदस्य : सुहासिनी वाघमारे, शिरीष देशपांडे, नंदकिशोर ठोंबरे, प्रकाश शिंपी, अभय ब्रह्मेचा, सुमती पवार.