
नाशिक। दि. २१ जुलै २०२६: पुणे येथील आयटी प्रोफेशनल (AI आणि डाटा सायन्स इंजिनिअर) अक्षय भाटकर हे दि. २० जुलै रोजी धार्मिक विधीसाठी नाशिक येथे आले होते. धार्मिक विधी आटोपल्यानंतर ते मालेगाव स्टॅन्ड येथून रिक्षाने रविवार कारंजा येथे गेले. रिक्षातून उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे दोन लॅपटॉप तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली त्यांची बॅग रिक्षामध्येच राहिली आहे. मात्र, तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती आणि त्यांच्या जवळ रिक्षाचा क्रमांकही नव्हता.
घटनेमुळे व्यथित झालेल्या अक्षय भाटकर यांनी तात्काळ सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठले. तेथे त्यांनी पोलीस अंमलदार संदीप रावसाहेब उघडे आणि पोलीस हवालदार देवराम खोडे यांना संपूर्ण घटना सांगितली.
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी अक्षय भाटकर यांची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच तातडीने मालेगाव स्टॅन्ड आणि रविवार कारंजा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले. फुटेजमध्ये संबंधित रिक्षा दिसत होती; मात्र तिचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. तरीही पोलिसांनी तत्परतेने चौकशी सुरू ठेवली. या दरम्यान इतर रिक्षाचालकांनाही संबंधित रिक्षामध्ये लॅपटॉपची बॅग राहिल्याची माहिती मिळाली.
सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू असतानाच जलाराम सेल्सचे संचालक मेहुल यांनी अक्षय भाटकर यांना फोन करून, “तुमची बॅग सापडली आहे. संबंधित रिक्षाचालकाने ती जलाराम सेल्स येथे सुरक्षित ठेवली आहे,” अशी माहिती दिली.

त्यानंतर अक्षय भाटकर यांनी पोलीस स्टेशनमधील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून जलाराम सेल्स येथे धाव घेतली. तेथे रिक्षाचालक राजेंद्र नथ्थू बागुल (रिक्षा क्रमांक : एमएच १५ एफयू ७९०८) यांनी त्यांची बॅग सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिली.
बॅग हरवणे आणि ती पुन्हा मिळणे हा संपूर्ण प्रकार अवघ्या दोन तासांत घडला. सरकारवाडा पोलिसांनी केलेली तत्पर कार्यवाही आणि रिक्षाचालक राजेंद्र नत्थू बागुल यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा यामुळे अक्षय भाटकर यांना त्यांची मौल्यवान बॅग सुखरूप परत मिळाली.
“बॅग परत मिळवून देण्यासाठी सरकारवाडा पोलिसांनी तात्काळ केलेले प्रयत्न आणि रिक्षाचालक राजेंद्र नत्थू बागुल यांचा प्रामाणिकपणा पाहून मी भारावून गेलो आणि माझा नाशिक पोलिसांवरचा विश्वास अजून वाढला” अशी भावना व्यक्त करत अक्षय भाटकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस अंमलदार संदीप रावसाहेब उघडे, पोलीस हवालदार देवराम खोडे तसेच रिक्षाचालक राजेंद्र नत्थू बागुल यांचे मनःपूर्वक आभार मानले.
![]()


