नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लग्नासाठीच्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर मुलगी पाहण्यासाठी आलेल्या संशयिताने मुलीच्याच नात्यातील युवतीला आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल साडेतीन लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल शामराव चोपडे (रा. पुणे-बँगलोर हायवे, थोरात मळा, कराड, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. अंबड लिंक रोड येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी विवाहसंदर्भातील एका मॅट्रिमोनीयल वेबसाईटवर संशयित अतुल याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर जून २०२३ मध्ये मुलीला पाहण्यासाठी संशयित नाशिकला आला होता.
त्यावेळी संशयिताने मुलीच्या घरातील नातलगांशी ओळख परिचय झाला असता, त्याने ज्योती यांच्या मुलीला आरोग्य खात्यातून नाशिक येथेच शासकीय नोकरी लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी त्याने ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्याच्या बँक खात्यावर घेतली आहे.
मात्र, त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतरही संशयिताने फिर्यादींच्या मुलीस नोकरीला लावून दिले नाही. तसेच, त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत केले नाहीत. यासंदर्भात विचारणा करूनही फायदा होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अंबड पोलिसात तक्रार दिली असून, त्यानुसार संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक किरण शेवाळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.