नाशिक: सिगारेट देण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून

नाशिक। दि. २२ एप्रिल २०२६: किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पेठरोड परिसरातील नवनाथनगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहिदास वामन आहेर (वय २६, रा. नवनाथनगर) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १८) रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ, पाटील दवाखान्यामागील परिसरात ही घटना घडली. राहुल कृष्णा राऊत (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत कृष्णा राऊत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल राऊत हा आपल्या मित्रांसह सिगारेट ओढत बसलेला असताना संशयित रोहिदास आहेर तेथे आला व त्याने सिगारेटची मागणी केली. राहुलने सिगारेट देण्यास नकार दिल्यानंतर संशयित संतप्त झाला. त्याने शिवीगाळ करत चॉपरच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले.

🔎 हे वाचलं का?:  घरफोडीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; सोन्या-चांदीसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने सोमवारी पहाटे सुमारे २ वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व पोलीस अधिकारी सुनील पवार करत आहेत. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २०६/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790